निलंगा , दि.०८
काळ सरला, आयुष्याच्या वाटा बदलल्या, अनेक जण देश-विदेशात स्थायिक झाले, तर काहींनी विविध क्षेत्रांत यशाची शिखरे गाठली. मात्र शालेय जीवनातील मैत्री, गुरुजनांचे संस्कार आणि गावाशी असलेली नाळ आजही तितकीच घट्ट असल्याचे भावस्पर्शी दर्शन कासार शिरसी येथे भरलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात घडले.
श्री करीब बसवेश्वर माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयातील सन १९९३-९४ च्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तब्बल ३३ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. भूकंपानंतरच्या कठीण आणि संघर्षमय काळात शिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्या सर्वांना पुन्हा एकाच छताखाली आणणारा हा सोहळा जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरला.
कार्यक्रमास सेवानिवृत्त सहशिक्षक एस. एस. बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माजी विद्यार्थी तथा गटशिक्षणाधिकारी संतोष शिवरूप स्वामी, परदेशात कार्यरत अभियंते प्रमोद बाबुराव चिंचनसुरे, सेवानिवृत्त सैनिक काशिनाथ रवींद्र नदीवाडे, कृषी अधिकारी वाजिद शेख यांच्यासह अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
“आज आपण ज्या स्थानावर आहोत, त्यामागे आपल्या शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे,” अशा भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांच्या चेहऱ्यांवर आनंद आणि समाधान झळकत होते. जुन्या आठवणी, वर्गातील खोड्या, अभ्यासातील प्रसंग आणि संघर्षाच्या काळातील अनुभव यांची उजळणी होताच वातावरण भारावून गेले.
याप्रसंगी सेवानिवृत्त सहशिक्षक यू. व्ही. उन्हाळे, व्ही. जी. कलशेट्टी, खोबरे सर, राजेंद्र गोरे, ज्योती वाडीकर, श्रीमती वर्षा कडतने, विद्यालयाच्या प्राचार्या सविता मुरूमकर तसेच बसमुंगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा आणि विद्यालयाशी असलेले नाते कायम जपावे, असे आवाहन केले.
भूकंपाच्या संकटानंतर शिक्षणाच्या बळावर स्वतःचे आयुष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या पुनर्मिलनाने केवळ जुन्या आठवणींनाच उजाळा मिळाला नाही, तर पुढील पिढीसमोर संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रेरणादायी आदर्शही उभा राहिला.
या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी बालाजी सावंत, अजित कानडे, हेमंत चौधरी, महेश व्यवहारे, महेश चिंचनसुरे, कांत्रप्पा माळशेट्टी, गुंडप्पा काजारे, विश्वनाथ कडतने, अकबर लामजने, शिवराज शालगर, रवी बिराजदार व आयुब मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.
३३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्रांच्या भेटीने मैत्री, संस्कार आणि ऋणानुबंधांची वीण अधिक दृढ झाली. हा स्नेहमेळावा उपस्थितांच्या स्मरणात कायमचा कोरला जाणारा ठरला.