निलंगा,दि.२७
निलंगा शहरात वीजपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, एका परिसरातील किरकोळ तांत्रिक बिघाडाची शिक्षा संपूर्ण शहराला भोगावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. एखाद्या एकाच वीज वितरण केंद्रात (डीपी) बिघाड झाला तरी अख्ख्या शहराचा वीजपुरवठा बंद करण्याची वेळ येत असल्याने महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेतील नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहरात तब्बल ७६ वीज वितरण केंद्रे कार्यरत असतानाही आवश्यक ठिकाणी ‘एबी स्विच’ बसविण्यात आले नसल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे ज्या भागात बिघाड होतो, तो परिसर वेगळा करून दुरुस्ती करण्याऐवजी संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित करावा लागत असल्याचे चित्र आहे. परिणामी, एका छोट्याशा तांत्रिक अडचणीचे रूप शहरव्यापी संकटात बदलत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. थोडासा पाऊस किंवा वाऱ्याचा वेग वाढला की शहरातील अनेक भाग अंधारात जात आहेत. रात्रीच्या वेळी तासन्तास वीज नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अभ्यासावर परिणाम, व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान आणि अंधारामुळे निर्माण होणारी असुरक्षितता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वीज वितरण व्यवस्थेच्या तांत्रिक निकषांनुसार प्रत्येक महत्त्वाच्या वितरण केंद्रावर ‘एबी स्विच’ असल्यास बिघाडग्रस्त भागापुरताच वीजपुरवठा बंद करून उर्वरित शहराचा पुरवठा सुरू ठेवता येतो. मात्र, ही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने प्रत्येक वेळी संपूर्ण शहराला अंधाराचा सामना करावा लागत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
विशेष म्हणजे, उन्हाळ्यात “पावसाळापूर्व देखभाल” या कारणास्तव अनेकदा तासन्तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तरीही पावसाळा सुरू झाल्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्या देखभाल कामांच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. मात्र, आवश्यक तांत्रिक सुविधा उभारण्यात होणारा विलंब आणि वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
निलंगा शहरातील वाढती लोकसंख्या आणि वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, आवश्यक त्या सर्व ठिकाणी ‘एबी स्विच’ बसवावेत, वीज वितरण व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी दूर करून शहराला अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून होत आहे.