लातूर, दि. 16
लातूर शहरात सुरू असलेल्या भूमिगत ड्रेनेज कामादरम्यान बोधेनगर परिसरात आज लहान मुलांकडून विटा आणि माती उचलण्याचे काम करवून घेतल्याचे उघड झाले. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामात बालमजुरी होत असल्याचे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांची उचकापाचक सुरू असून नुकतेच झालेले रस्ते पुन्हा पुन्हा खोदले जात आहेत. कोणताही अभ्यास, नियोजन किंवा देखरेख नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यातच बालमजुरीचा प्रकार उघड झाल्याने महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनास्थळी दिसलेल्या अल्पवयीन मुलांकडून विटांची वाहतूक, मातीची बादली उचलणे आणि खोदकामावरील सहाय्यक कामे करवून घेतली जात असल्याचे स्पष्ट दिसले. बालमजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार 14 वर्षांखालील मुलांना कोणत्याही प्रकारच्या कामासाठी लावणे गुन्हा असून गुत्तेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे.
तरीही या प्रकरणी महानगरपालिका किंवा संबंधित अधिकार्यांनी कोणतीही तातडीची दखल घेतलेली नाही. “सार्वजनिक ठेक्यांमध्येही बालमजुरी होत असेल तर प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. बालमजुरीचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही टीका होत आहे