रस्ता दुरुस्तीचा मुहूर्त काही केल्या लागत नाही; नागरिकांच्या मनक्यांना फटका 🌩️
निलंगा, दि.17
निलंगा तालुक्यातील कोकळगाव – मदनसुरी – नदी हत्तरगा हा महत्त्वाचा ग्रामीण मार्ग पूर्णपणे खड्यांनी भरून गेला असून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. जगोजागी खड्डे, चिखल, पाणी साचणे आणि डांबर निघून गेल्याने पादचारी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहने तसेच जड वाहनांना प्रवास करणे अक्षरशः जीव मुठीत धरून करावे लागत आहे.
रस्ता पूर्णपणे उखडल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली उलटणे, दुचाकी घसरून अपघात, टायर पंक्चर, वाहनांचे पाटे तुटणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक नागरिकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला असला तरी दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
निकृष्ट कामाचे दुष्परिणाम
दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे काही महिन्यांतच रस्ता पुन्हा उखडून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोकळगाव – नदी हत्तरगा – किल्लारी मोडपर्यंत हा मार्ग अक्षरशः शेवटच्या श्वासावर आला आहे.
मनक्यांचा त्रास; बससेवाही बंद
या खराब रस्त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना शारीरिक मणक्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर बसेस धावत नसल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड गैरसोय भोगावी लागत आहे.
वाहतूक व वर्दळ प्रचंड पण रस्ता झोपेवर
कोकळगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याने चार-पाच गावांची सतत वर्दळ असते. तसेच मदनसुरी, कोकळगाव, नदी हत्तरगा येथील शेतकऱ्यांची किल्लारी बाजारपेठेवर अवलंबित्व असल्याने रोज मोठ्या प्रमाणात वाहने या मार्गाने जातात. परंतु रस्त्याचा पुरता ऱ्हास झाल्याने अनेक वाहने धजावतच नाहीत.
काटेरी कुंपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले
तेरणा नदी तीरावरील बंधाऱ्यापासून नदी हत्तरगा जुने गावपर्यंत सरकारी बाभळीचे काटेरी कुंपण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण अधिक वाढले आहे.
नागरिकांचा इशारा : रस्ता न दुरुस्त झाल्यास तीव्र आंदोलन
स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून तातडीने रस्ता दुरुस्त न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
“रस्ता देता का हो कोणी रस्ता?”
अशी हतबल आर्त हाक या भागात आता रोज ऐकू येत आहे.