प्रतिनिधी | भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा मूलभूत आधार आहे. संविधानाचा अभ्यास केल्याशिवाय नागरिकांना आपल्या अधिकारांची, कर्तव्यांची, आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदींची, सामाजिक न्यायाची आणि लोकशाहीच्या तत्त्वांची सखोल माहिती होऊ शकत नाही, असे मत भरत गोविंदराव सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

आज अनेकजण संविधानाबाबत विविध मते व्यक्त करतात; मात्र त्यांनी संविधानाचा प्रत्यक्ष अभ्यास केलेला नसल्याने अनेक गैरसमज समाजात पसरतात. संविधानाचे नियमित वाचन केल्यास प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांसोबतच जबाबदाऱ्यांचीही जाणीव होते. तसेच आरक्षण ही दया किंवा सवलत नसून सामाजिक न्यायासाठी करण्यात आलेली घटनात्मक तरतूद आहे, हेही संविधानातून स्पष्ट होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीयाला समान संधी, समान अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, या उद्देशाने भारतीय संविधानाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या विचारांचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी संविधानाचे वाचन आणि अभ्यास करणे आवश्यक असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी “एक घर, एक संविधान” हा संदेश देत प्रत्येक घरात भारतीय संविधानाची प्रत असावी आणि प्रत्येक कुटुंबाने त्याचे नियमित वाचन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. संविधान वाचणारा समाजच जागरूक, विवेकी, न्यायप्रिय आणि लोकशाहीला अधिक बळकटी देणारा समाज ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, “आजच संकल्प करूया—प्रत्येक घरात भारतीय संविधान ठेवूया, प्रत्येक भारतीयाने संविधान वाचूया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीतून जपूया.”
संपर्क:
भरत गोविंदराव सूर्यवंशी
मो.: 95617 32304