“न्याय कुठे आहे?”
निलंगा, दि. २०
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे बुजरुगवाडी येथे घडलेली घटना ही केवळ एक गुन्हा नसून, महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उभं करणारी आणि मानवतेलाच काळिमा फासणारी आहे. वडार समाजाच्या एका युवकावर गावातीलच दबंग व्यक्ती आणि पोलिस यंत्रणेतील कर्मचाऱ्यांकडून कथितपणे करण्यात आलेल्या अमानुष अत्याचारामुळे संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आनंद हरी जाधव (वय ३१,वर्षे रा. बुजरुगवाडी) हे दिनांक ०९ मार्च रोजी निटूर येथील बाजारात गेले असताना, पोलिस पाटील विकास पाटील, विलास पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना अडवून जातिवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी निर्दयी होती की, त्यानंतर त्यांना थेट निटूर येथील पोलिस दूरक्षेत्रात ओढत नेण्यात आले.
धक्कादायक आणि संतापजनक आरोप म्हणजे पोलिस ठाण्यातच पुन्हा मारहाण करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल सुधीर शिंदे व इतरांनी युवकाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. कायद्याचे रक्षकच जर अत्याचार करत असतील, तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा?
पीडिताच्या कथनानुसार, त्याला बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता, पिण्याचे पाणी मागितल्यावर त्याच्या अंगावर लघुशंका केल्याचा अमानुष प्रकार घडल्याचा आरोप आहे. “गाव सोड नाहीतर परिणाम भोगावे लागतील,” अशी उघड धमकी देण्यात आली.
अत्याचाराची मालिका इथेच थांबली नाही…
१३ मार्च रोजी केळगाव परिसरात पुन्हा गाठून, “तक्रार केलीस तर जिवंत ठेवणार नाही,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या सर्व प्रकारानंतरही पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घ्यायलाच नकार दिला, अशी गंभीर बाब समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रेही वेळेवर न देऊन, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, पीडिताने लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतले असून, एम एल सी नोंद करण्यात आली आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही ही संपूर्ण व्यवस्थेची कसोटी आहे.
दलित, वंचित आणि दुर्बल घटकांवर आजही अशा प्रकारचे अत्याचार होत असतील, तर संविधान आणि कायद्याची अंमलबजावणी नेमकी कुठे आहे?
या प्रकरणात तात्काळ गुन्हे दाखल करून, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून अटक करावी, तसेच निष्पक्ष चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर यांनी पीडिताची भेट घेऊन घटनेचा आढावा घेतला असून, वंचितांचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. “न्याय मिळाला नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू,” असा इशाराही देण्यात आला आहे.
आता प्रश्न एकच दोषींवर कारवाई होणार की प्रकरण दडपलं जाणार?