नाशिक, दि.२८
चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी लिपी, लेणी, स्तूप व शिलालेखांच्या माध्यमातून धम्माचा प्रसार केला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला नवी दिशा देत धम्म व राष्ट्र समृद्ध केले, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते किरण माने यांनी केले.
दान पारमिता फाऊंडेशनच्या वतीने “जयंती दोन बोधिसत्वांची” या उपक्रमांतर्गत सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आंबेडकरी शाहिरी जलसा व व्याख्यान कार्यक्रम सिडको येथील मायको हॉल, कवी नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय येथे उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी किरण माने बोलत होते.

या कार्यक्रमात किरण माने यांना “धम्म रत्न” पुरस्कार देऊन सुनील खरे व प्रा. शरद शेजवळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच बुद्ध-भीम गीतांचा आंबेडकरी जलसा सादर करण्यात आला व “दोन बोधिसत्व” या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली.
डॉ. आशालता देवळीकर यांनी महिलांसाठी डॉ. आंबेडकरांचे योगदान स्पष्ट केले, तर प्रा. विकास शिंदे यांनी “मौर्यकालीन भारत व आधुनिक भारत” या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शरद दिनकर शेजवळ व सहकाऱ्यांनी सामाजिक प्रबोधनपर आंबेडकरी शाहिरी जलसा सादर केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. एल. कराड होते. प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब साळवे (सहाय्यक आयुक्त, मनपा नाशिक), डॉ. मोहन बच्छाव (तालुका वैद्यकीय अधिकारी) व संजय दिवे (मुक्त विद्यापीठ) उपस्थित होते.
प्रास्ताविक सुनील खरे यांनी केले, सूत्रसंचालन सुजाता मोरे यांनी केले, तर आभार संतोष आंभोरे यांनी मानले.
दान पारमिता फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील खरे, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, संतोष आंभोरे व सिद्धार्थ खरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.