गो-रक्षक कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला… धारदार शस्त्रांनी वार परिसर हादरला…
निलंगा,दि.१७
औराद-शाहजनी परिसर शनिवारी सायंकाळी अक्षरशः दहशतीच्या सावटाखाली गेला, जेव्हा गोवंश वाहतुकीच्या संशयावरून दोन गटांमध्ये झालेला वाद काही क्षणांत रक्तरंजित संघर्षात बदलला. गो-रक्षणाच्या उद्देशाने गेलेल्या कार्यकर्त्यांवर पाच जणांच्या टोळक्याने कोयते, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी थेट हल्ला चढविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरुवातीला केवळ शाब्दिक वाद सुरू होता; मात्र काही वेळातच आरोपी आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांवर बेछूट वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घटनास्थळी आरडाओरड, धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही कार्यकर्ते जीव वाचवण्यासाठी पळू लागले, तर काही जण रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडले होते.
फिर्यादी आदर्श अजित जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, औराद-शाहजनी मार्गावरून संशयास्पदरीत्या गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह संबंधित वाहनाचा माग काढण्यासाठी गेले होते. वाहन अडवून विचारणा केली असता आरोपी संतप्त झाले आणि त्यांनी थेट हल्ला चढविल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या हल्ल्यात काही कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या अंगावर धारदार शस्त्रांचे घाव असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेदरम्यान काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आली असून, परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.
या प्रकरणी औराद-शाहजनी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 109(1), 118(1), 189(4), 190, 191(2), 191(3), 352 तसेच शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 4 व 25 नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे औराद-शाहजनी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्धन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.