लातूर,१२(मिलिंद कांबळे)
ज्ञान, समता, मानवता आणि परिवर्तनाच्या विचारांनी भारलेले वातावरण… बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर… आणि साहित्य, कविता, कथाकथनातून उलगडलेली सामाजिक जाणीव… अशा प्रेरणादायी वातावरणात लातूर येथे दुसरे बौद्ध साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी, भालचंद्र ब्लड बँक, लातूर येथे आयोजित या भव्य सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर विचारांची अमिट छाप उमटवली.
लातूर महानगरपालिकेच्या महापौर आयु. जयश्रीताई सोनकांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. प्रशांत गायकवाड उपस्थित होते. त्यांच्यासह डॉ. नारायण कांबळे, डॉ. गिरीश मोरे, साहित्यिक अमित मेधावी, डॉ. लहू वाघमारे, प्रा. बापू गायकवाड आदी मान्यवरांनी विचारपीठ गाजवले.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले.
संमेलनाध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बौद्ध धम्मातील करुणा, प्रज्ञा आणि समतेचा संदेश प्रभावीपणे मांडला. “समाज परिवर्तनासाठी साहित्य हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे,” असे सांगत त्यांनी बुद्ध-विचारांची आधुनिक काळातील गरज अधोरेखित केली.
प्रसिद्ध साहित्यिक अमित मेधावी यांनी “तथागत गौतम बुद्धांची स्त्री विषयक भूमिका” या विषयावर भाष्य करत स्त्री स्वातंत्र्य आणि समतेचा वैचारिक पाया बुद्धांनीच घातल्याचे स्पष्ट केले. डॉ. गिरीश मोरे यांनी “गौतम बुद्धांचे प्रतिरोधाचे तत्त्वज्ञान” यावर प्रभावी विवेचन केले, तर प्रा. बापू गायकवाड यांनी “कालामसुत्त : वर्तमान समाजाची गरज” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. नारायण कांबळे आणि यु. डी. गायकवाड यांनीही परिसंवादात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वैचारिक चर्चेला उंची प्राप्त करून दिली.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आयु. अनुपमा मुक्ताराम लामतुरे (बोरीकर), डॉ. प्रशांत मुगळे, प्रा. दत्तात्रय सूर्यवंशी, शांतरक्षित सुरवसे, सविता नितीन गायकवाड, रवींद्र राजेगावकर आणि कु. ऐश्वर्या सुशील चिकटे यांना “प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
तर सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विलास सूर्यवंशी, एन. डी. सोनकांबळे, बापू साहेबराव खोसे आणि अनिल उत्तमराव हजारे यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. कविवर्य संजय घाडगे यांना “महाकवी नामदेव ढसाळ पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इंजिनिअर दीपक कांबळे आणि राजेंद्र बनसोडे यांचाही सन्मान करण्यात आला.
संमेलनाच्या समारोपावेळी कथाकथन आणि कवी संमेलनाने उपस्थितांची मने जिंकली. कविता, शब्द आणि विचारांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारे हे संमेलन लातूरच्या सांस्कृतिक आणि वैचारिक इतिहासात एक प्रेरणादायी पर्व ठरले.
या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कार्याध्यक्ष तथा संयोजक संपादक राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष भगवान लोखंडे, सचिव यु. डी. गायकवाड, सहसचिव भगवान बनसोडे, जीजी कांबळे, मंगलताई कांबळे, शांत रक्षित सुरवसे, रवींद्र राजेगावकर, मारुती सर्वदे, राजेंद्र बनसोडे, नितीन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि नागरिक उपस्थित होते.
मिलिंद कांबळे,लातूर
मो.9960049411