निलंगा,दि.०६
ओंकार साखर कारखाना उद्योगसमूहाविरोधात सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या ऊस बिल थकबाकी व आर्थिक गैरव्यवहाराच्या अफवा पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि उद्योगसमूहाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप ओंकार उद्योगसमूहाचे प्रतिनिधी ओमराजे बोत्रे पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी राज्यातील विविध ठिकाणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून लवकरच अब्रूनुकसानीचे दावे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
राज्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक बाजारभाव देणारा उद्योगसमूह म्हणून ओंकार समूहाची ओळख निर्माण झाली असून महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये एकूण १७ साखर कारखाने यशस्वीपणे कार्यरत आहेत. यंदाच्या गळीत हंगामात समूहाने सुमारे ७५ लाख टन ऊस गाळप केले असून आगामी काळात १ कोटी टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
उद्योगसमूहाशी १८ हजारांहून अधिक कामगार, हजारो वाहतूकदार, ट्रॅक्टर-ट्रक चालक, मुकादम आणि सुमारे ८ लाख शेतकरी जोडलेले आहेत. राज्यातील अनेक वर्षे बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करून सक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर यशस्वीपणे चालविल्याचा दावा समूहाने केला आहे.
समूहाकडून आज अखेर शेतकऱ्यांना १८३० कोटी रुपये, तर वाहतूकदारांना ७१० कोटी रुपये अदा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यंदाच्या हंगामात उद्योगसमूहाचा ६ हजार कोटी रुपयांचा उलाढाल झाला असून पुढील वर्षी तो ७ हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या इथेनॉल मिश्रण धोरणामुळे इथेनॉल व मोलॅसिस विक्री प्रक्रियेत विलंब झाला असून सुमारे ६०० कोटी रुपये येणे बाकी असल्याने ऊस बिलांच्या देयकात अल्प विलंब झाला आहे. मात्र पुढील आठवड्यात शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांचे एकही देयक बाकी राहणार नसल्याचा विश्वास ओमराजे बोत्रे पाटील यांनी व्यक्त केला.
“शेतकरी, वाहतूकदार व कामगारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी थेट कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले.