लातूर, दि.०५
आजच्या स्वार्थप्रधान आणि धावपळीच्या युगात प्रामाणिकपणा जपणारी माणसे दुर्मिळ होत चालली असताना, लातूर येथील ऑटोचालक हनुमंत पितांबर लोखंडे यांनी आपल्या कृतीतून माणुसकी, नैतिकता आणि बौद्ध संस्कारांचे जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत करून त्यांनी समाजात एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.
घडले असे की, निळूबाई श्रीमंत गफले या महिला प्रवासादरम्यान हनुमंत लोखंडे यांच्या ऑटोमध्ये आपली पर्स विसरून गेल्या. त्या पर्समध्ये पाच हजार रुपयांची रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर किमती वस्तू होत्या. अशा वेळी अनेकजण मोहाला बळी पडू शकतात; मात्र हनुमंत लोखंडे यांनी प्रामाणिकपणाची कास धरत पर्स सुरक्षित ठेवली.
पर्समधील उपलब्ध मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर वाहतूक शाखेचे पीएसआय माधव केंद्रे यांच्या हस्ते सदर पर्स निळूबाई गफले यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आली. हरवलेली पर्स परत मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त करत लोखंडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
हनुमंत लोखंडे हे भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा लातूर पश्चिमच्या समता सैनिक दलाचे पदाधिकारी असून त्यांच्या या कृतीतून बौद्ध धम्मातील शील, करुणा, प्रामाणिकपणा आणि परोपकार या मूल्यांचे दर्शन घडले. तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणीचे त्यांनी कृतीतून पालन करत “शील हेच खरे सौंदर्य” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस सुग्रीव नागरगोजे, मस्के साहेब, तसेच ऑटो युनियनचे पवन कांबळे सेलुकर, कृष्णा डावखरे, महादेव हसबे, विकास मस्के, दत्ता ऐकले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी लोखंडे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांना समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरवोद्गार काढले.
हनुमंत लोखंडे यांच्या या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, बौद्ध संस्कार हे केवळ विचार नसून ते आचरणातून प्रकट होणारे जीवनमूल्य आहेत. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या या आदर्शातून प्रेरणा घेण्याची गरज आहे.