औराद (शहाजनी), प्रतिनिधी :
औराद (शहाजनी) परिसरातील अनेक अंगणवाडी केंद्रांच्या जीर्ण आणि धोकादायक इमारतींमध्ये आजही चिमुकले शिक्षणाचे पहिले धडे गिरवत असल्याचे वास्तव समोर आले आहे. काही इमारतींना मोठे तडे गेले असून छत व भिंतींची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सौ. योगिता ताई उमाकांत जाधव यांनी संबंधित अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी अंगणवाडी सेविका, पालक, स्थानिक नागरिक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. जीर्ण इमारतींमुळे लहान बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात योगिता जाधव यांनी बाल विकास सभापती यांच्याकडे जीर्ण अंगणवाड्यांच्या जागी नवीन इमारती मंजूर करण्याची ठाम मागणी केली. तसेच या कामासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून बालकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार वातावरण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अंगणवाडी हे ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासाचे पहिले केंद्र मानले जाते. अशा केंद्रांच्या इमारतीच धोकादायक अवस्थेत असतील तर चिमुकल्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याबरोबरच त्यांच्या शिक्षण व पोषण व्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाकडे प्रशासनाने केवळ बांधकामाचा विषय म्हणून नव्हे, तर बालसुरक्षेशी निगडित अत्यंत संवेदनशील प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या पाहणीमुळे औराद (शहाजनी) येथील अंगणवाड्यांची वास्तविक परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आली असून, आता संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन नवीन इमारतींची मंजुरी देत कामांना गती देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.