सोलापूर,दि.०६
सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ व पत्रकार, दैनिक समर्थ गावकरीचे जिल्हा प्रतिनिधी, सुयश मीडिया ग्रुपचे ब्युरो चीफ तसेच साप्ताहिक चैत्यभूमीचे संपादक महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. पत्रकारांवरील वाढते हल्ले, अन्याय आणि दडपशाहीविरोधात संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने गायकवाड यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महेश गायकवाड हे गेली ४२ वर्षे निर्भीड, निःपक्ष, रोखठोक आणि बेधडक पत्रकारिता करत असून त्यांनी विविध दैनिके व साप्ताहिकांमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू आणि अनुभवी पत्रकार म्हणूनही त्यांची राज्यभर ओळख आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने परखड भूमिका मांडत त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ठसा उमटविला आहे.
त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पत्रकार हल्ला विरोधी समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य संघटक संजय भोकरे तसेच राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
महेश गायकवाड यांच्या निवडीचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी, पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात प्रभावी लढा उभारण्यासाठी आणि पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितच होईल, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.