लातूर, दि. २३ (प्रतिनिधी)
संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अ. भा. परिट-धोबी समाज संघटनेच्या वतीने छ. राजर्षी शाहू महाराज उद्यान, लातूर येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रा. सुधीरराव जाधव यांनी “संत गाडगे बाबांचे अध्यात्मिक अर्थशास्त्र हे सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे होते,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणपतराव तेलंगे होते. साहित्यिक प्रा. रामकिशन समुखराव व सेवानिवृत्त गटविकास अधिकारी डी. व्ही. वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उद्यान परिसरातील सामूहिक स्वच्छता अभियानाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा. जाधव पुढे म्हणाले की, गाडगे महाराजांनी सार्वजनिक स्वच्छतेच्या माध्यमातून आरोग्याचे महत्त्व समाजमनात ठसवले. योग्य बचत, उपयुक्त खर्च आणि शिक्षणाची गरज त्यांनी आपल्या प्रबोधनातून जनमानसात रुजवली. अल्प साधनसामग्रीतून समाजजागृतीचा व समतेचा संदेश देत त्यांनी सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. त्यांच्या कृतीजीवनातील अनेक संकल्पना आज शासनाच्या विविध योजनांमधून प्रत्यक्षात येताना दिसतात. तसेच जागतिक आरोग्य संघटनांसारख्या संस्था ज्या विषयांवर आज कार्यरत आहेत, त्या बाबींची जाणीव गाडगे महाराजांनी शतकापूर्वीच करून दिली होती, असेही त्यांनी नमूद केले.
वैचारिक संपत्ती आजही अस्वस्थ करणारी – प्रा. रामकिशन समुखराव
यावेळी बोलताना प्रा. रामकिशन समुखराव यांनी सांगितले की, संत गाडगे महाराजांची वैचारिक संपत्ती आजच्या आधुनिक समाजालाही विचार करायला भाग पाडते. अत्यंत साधी जीवनशैली—एक झाडू, फुटके गाडगे, काठी आणि फाटकी घोंगडी—यांच्या आधारावर त्यांनी समाजप्रबोधनाची भक्कम चळवळ उभी केली. त्यांच्या आर्थिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास आज विद्यापीठस्तरावर संशोधनाच्या विषय ठरत असून, भारतीय समाजासाठी तो अभिमानास्पद वारसा आहे.
सेवानिवृत्त बीडीओ डी. व्ही. वाघमारे यांचेही समायोचित मनोगत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त केंद्रीय मुख्याध्यापक मारोतराव सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन संजय व्यवहारे यांनी तर आभार प्रदर्शन दलित मित्र सुरेशराव चव्हाण यांनी केले.
यावेळी सिताराम पवार, से. नि. तहसीलदार दामोधर इंगळे, माजी सरपंच माधवराव गायकवाड, सुनील उबाळे, शाम वरयानी, हर्षवर्धन सूर्यवंशी, पैलवान दगडू लांडगे, मधुकर कांबळे, एस. एम. तरुडे, बाबुराव काळे, माधवराव सूर्यवंशी, गंगाधरराव नागरगोजे, महादेव तेलंगे, गोरोबाकाका शिंदे, दत्तात्रय कल्लेकर, नागना बोळशेट्टे, शिवकुमार चौंडे, हरिश्चंद्र महाराज घोलप, अंकुशराव देवकाते, मुन्ना पांचाळ, दामोधर नाळापुरे, रमेशराव केंद्रे, बालाजी अलगुले, श्रीपतराव शिंदे, अविनाश माने, निवृत्ती जाधव, दिगंबरराव भोसले, रामकुमार रायवाडीकर, दिगंबरराव बारसकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमातून संत गाडगे महाराजांच्या स्वच्छता, समता आणि प्रबोधनाच्या विचारांचा पुनःप्रत्यय उपस्थितांना मिळाला.