निलंगा,दि.११
मराठा समाजाच्या हक्कासाठी उभ्या केलेल्या जन- आंदोलनातून राज्यभर चर्चेत आलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समाजातील गोरगरीब शेतकरी, महिला आणि लेकरांच्या हक्कासाठी आयुष्य झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला. “लोक मला जातीवादी म्हणोत, पण माझ्या समाजातील सामान्य माणसाच्या न्यायासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणार,” असा ठ इशारा त्यांनी दिला.
ते निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथे आयोजित जागृत देवस्थान श्री मारोती आराधना कार्यक्रमानिमित्त झालेल्या सभेत बोलताना त्यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर थेट भाष्य केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेल्या संघर्षातून लाखो कुटुंबांची व्यथा जवळून पाहिल्याचे सांगत त्यांनी समाजातील लेकरांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सक्षम मदतयंत्रणा उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.
“मला फक्त एक वर्ष द्या; राज्याच्या कानाकोपऱ्यात अशी संघटित यंत्रणा उभी करीन की समाजातील कोणत्याही लेकरावर संकट आले तर अवघ्या पंधरा मिनिटांत मदत पोहोचेल,” असे ठाम आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यांच्या या वक्तव्याने सभास्थळी उपस्थित जनसमुदायात प्रचंड उत्साह आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
ते पुढे म्हणाले की, समाजातील मुला-मुलींना शिक्षणाची संधी, शेतकऱ्यांना शेतीत सुरक्षितता, तरुणांना रोजगार आणि लहान व्यावसायिकांना आधार मिळाला पाहिजे. समाजातील प्रत्येक घरातील लेकरांच्या ताटात भाकर पडावी आणि त्यांच्या भविष्याला भक्कम आधार मिळावा, यासाठी राज्यभर मजबूत संघटनात्मक जाळे उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निलंगा शहरात जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. माकणी थोर येथे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि रथातून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जागृत देवस्थान श्री मारोती मंदिरात त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, मराठा समाजातील बांधव आणि भाविक उपस्थित होते.
जरांगे पाटील यांच्या भाषणानंतर उपस्थितांमध्ये नव्या संघर्षाची ऊर्जा आणि समाजातील लेकरांच्या भवितव्याबद्दल नव्या आशेची भावना निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.