निलंगा, दि.०५
निलंगा शहरातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष श्री. शेषेराव (तात्या) कांबळे (वय ८० वर्षे, रा. मिलिंद नगर, निलंगा) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने निलंगा शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
तात्या हे नाव निलंग्यात केवळ एका व्यक्तीचे नाव नव्हते, तर ते विश्वास, माणुसकी आणि नात्यांची उब यांचे प्रतीक होते. आंबेडकरी चळवळीशी त्यांची नाळ अतूटपणे जोडलेली होती. त्यांनी आयुष्यभर चळवळीचे मूल्य जपत समाजातील वंचित, दुर्बल घटकांसाठी झटत राहिले.“चळवळीची ओढ आणि राजकारण यांच्या पलिकडचे नाते” त्यांनी आपल्या आयुष्यभर जपले आणि तेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैशिष्ट्य ठरले.
त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात रिपब्लिकन पार्टी (गवई गट) मधून केली. त्यानंतर आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल सहा दशके प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहिले. जनतेने त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी विकासकामांना चालना दिली.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी संजय गांधी निराधार योजनेत अनेक वर्ष सदस्य म्हणून कार्य केले. या माध्यमातून त्यांनी असंख्य निराधार, विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. अनेक कुटुंबांच्या संसारात त्यांनी आशेचा किरण निर्माण केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली, आणि त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडली.
शैक्षणिकदृष्ट्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तात्यांनी तरुणपणी धावण्याच्या स्पर्धांमध्ये विभागीय स्तरावर यश संपादन केले होते. मात्र त्यांच्या आयुष्यातील खरी शर्यत समाजसेवेची होती.आणि ती त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे पूर्ण केली.
तात्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे, संयमी आणि सर्वसमावेशक होते. त्यांनी कधीही पक्ष, पंथ किंवा समाज यांचे बंधन न ठेवता सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले. म्हणूनच सर्व समाजघटकांमध्ये तसेच सर्व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांना अपार आदर आणि प्रेम मिळाले. त्यांनी जपलेला मित्रपरिवार अत्यंत मोठा आणि विविधतेने नटलेला होता.
भारतीय बौद्ध महासभा, निलंगा तालुक्याचे संस्कार उपाध्यक्ष आयु. इंद्रजीत कांबळे यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे तसेच मोठा परिवार असा आप्तपरिवार आहे.
तात्यांच्या निधनाने निलंग्याने केवळ एक ज्येष्ठ नेता गमावलेला नाही, तर समाजाला जोडणारा, संकटात धावून जाणारा, माणुसकीचा दीप जपणारा एक आधारवड हरपला आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेले संस्कार निलंगा शहरासाठी कायम प्रेरणादायी राहतील.