निलंगा, दि. १५
निलंगा तालुक्यातील युवक डॉ. अमर मंजू हिरालाल निंबाळकर यांनी परदेशातील किर्गिस्तान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि अभिमानाने साजरी करून निलंगा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
परदेशात राहूनही आपल्या मातृभूमीशी, संस्कृतीशी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी नाळ कायम जोडून ठेवणाऱ्या डॉ. अमर निंबाळकर यांनी किर्गिस्तानमध्ये जयंती साजरी करत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. संविधान, समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश त्यांनी तेथील भारतीय व स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
आज अनेक युवक परदेशात शिक्षण, नोकरी आणि करिअरसाठी जातात. मात्र त्या धकाधकीत सामाजिक बांधिलकी विसरली जाते. अशा काळात डॉ. अमर निंबाळकर यांनी परदेशात राहूनही बाबासाहेबांचे विचार जपले, ही बाब प्रेरणादायी मानली जात आहे.
त्यांच्या या कार्यामागे मातोश्री सौ. मंजू हिरालाल निंबाळकर यांचे संस्कार, सामाजिक जाणीव आणि आंबेडकरी विचारांचे बाळकडू असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. “ज्या घरात विचारांची शिदोरी असते, त्या घरातूनच समाजासाठी लढणारी पिढी घडते,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
निलंगा येथेही डॉ. अमर निंबाळकर यांनी बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करून युवकांना संघटित होण्याचा आणि शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा संदेश दिला होता.
त्यांच्या या कार्याचे निलंगा तालुक्यात सर्व स्तरांतून स्वागत होत असून युवकांनी परदेशात जाऊनही आपली ओळख, विचार आणि सामाजिक जबाबदारी विसरू नये, असा आदर्श त्यांनी घालून दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
निलंग्याचा हा भूमिपुत्र आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
देशाने आदर्श घ्यावा असा हा युवक, निलंग्याचा खरा अभिमान ठरत आहे.