लातूर,दि.२१
औसा तालुक्यातील खरोसा गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका तरुण आईने आपल्या दोन निष्पाप चिमुकल्यांसह विहिरीत झेप घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत.
मृत महिलेचे नाव निकिता अमरदीप भूरे (वय २५) असे असून, तिच्यासोबत तिची लाडकी चिमुकली मुले शिवानी आणि शिवांश यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आईच्या कुशीत खेळणारी लेकरं काही क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने गावभर हळहळ व्यक्त होत आहे.
घराजवळील विहिरीत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ही बाब उघडकीस येताच गावकरी घटनास्थळी धावले. विहिरीकडे पाहताना अनेकांच्या हंबरडा फुटला. निष्पाप लेकरांचे निश्चल देह पाहून गावकऱ्यांचे काळीज तुटले.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक कारणातून ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे खरोसा गावात शोककळा पसरली आहे. चिमुकल्यांच्या हास्याने गजबजणारे घर आज कायमचे ओस पडले. आईच्या मायेची सावली हरपली आणि दोन निरागस जीवही निघून गेल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आहे.
खरोसा गाव आजही त्या विहिरीकडे पाहत नि:शब्द उभे आहे… आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न आहे असं काय घडलं असेल?