धाराशिव,दि.२०
दोन लाख रुपयांच्या हव्यासाने एका निर्दयी पतीने स्वतःच्या पत्नीचाच जीव घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उमरगा येथे घडली आहे. पैशांच्या लालसेपोटी एका तरुणीचा संसार उद्ध्वस्त झाला, तर दोन वर्षांचा निष्पाप चिमुकला आईच्या मायेविना पोरका झाला आहे.
मृत विवाहितेचे नाव पलक दत्ता कांबळे (वय २२) असे आहे. याप्रकरणी तिची आई केशर धनाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती दत्ता श्यामराव कांबळे (वय २७) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पलक हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी उजळंब (ता. बसवकल्याण, जि. बिदर) येथील दत्ता कांबळे याच्याशी झाला होता. संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन सासरी गेलेल्या पलकच्या वाट्याला मात्र छळ, शिवीगाळ आणि मारहाण आली. आरोपी दत्ता हा दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता. स्वतःचे रिपेरिंग दुकान सुरू करण्यासाठी पत्नीने माहेरावरून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी तो तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ करत होता.
दि. १७ एप्रिल रोजी रात्री उशिरा आरोपीने पलक हिचा गळा आवळून तिची हत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 80 व 85 अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, पलकची आई, मामा राम गायकवाड, विष्णू गायकवाड तसेच नातेवाईकांनी सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत.
जिच्या हातांनी संसार फुलवायचा होता, त्याच हातांना मृत्यूने कवटाळले… आणि ज्या लेकराने ‘आई’ म्हणत कुशीत झोपायचं होतं, ते लेकरू आज कायमचं आईविना झालं.