लातूर,दि.०६(मिलिंद कांबळे)
अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण प्रक्रियेविरोधात सोमवारी लातूर येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील ५८ जाती समूहांच्या वतीने विराट महामोर्चा काढण्यात आला. हजारो नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बौद्धनगर) येथून मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी आमदार बबनराव घोलप, युवा नेते अमन आंबेडकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चानंतर झालेल्या सभेत वक्त्यांनी अनुसूचित जातीच्या ५९ पैकी केवळ एका जातीच्या मागणीवर संपूर्ण प्रवर्गावर उपवर्गीकरण लागू करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. या निर्णयामुळे आरक्षणाचा घटनात्मक उद्देश आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना धक्का बसू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली..यावेळी उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने रद्द करावा, त्यासाठी नेमलेली समिती व तिचा अहवाल रद्द करावा, अनुसूचित जातींसाठी रिक्त असलेली सर्व आरक्षित पदे त्वरित भरावीत, लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २० टक्के आरक्षण द्यावे तसेच शिक्षण, शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या सुविधा वाढवाव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यभर अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.
मिलिंद कांबळे,निलंगा
मो.9960049411