निलंगा (प्रतिनिधी)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच निलंग्यातील राजकारणातही चांगलीच उठाठेव सुरू झाली आहे. सत्ताधारी आमदारांनी श्री नीलकंठेश्वर मंदिराच्या विकासकामाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केला आहे.
निलंग्याचे आराध्यदैवत असलेले श्री.निलकंठेश्वर मंदिर हे श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. मागील वर्षभरापासून या मंदिराचे पंढरपूर व तुळजापूरच्या धर्तीवर मूळ रूपात पुनर्रचनाचे काम सुरू आहे. मात्र, या कामात कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदारांनी सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या हस्ते महाआरती कार्यक्रमाचे आयोजन करून प्रचाराचा नारळ फोडण्याचा प्रयत्न केल्याने विरोधक संतप्त झाले आहेत. त्यांनी या कार्यक्रमावर तिखट हल्लाबोल करत, “ज्यांच्या काळात मंदिराच्या निधीत भ्रष्टाचार झाला, त्यांनीच भक्तीचा दिखावा करणं म्हणजे धार्मिकतेचा अपमान आहे,” अशी टीका केली आहे.
विरोधकांनी इतकेच नव्हे तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेल्या मंत्री यांनाही “निलंग्यात आलात तर तुम्हाला पाप लागेल, महादेवाचा कोप ओढवेल” असे आव्हान दिले आहे.
दरम्यान, नागरिकांमध्ये या घडामोडींविषयी संताप उसळला आहे. “रस्ते खड्डेमय, पाणीपुरवठा विस्कळीत, कचऱ्याचे साम्राज्य आणि रोजगाराची चणचण असताना आमदारांना फक्त महाआरती दिसते! हा विकासाचा ढोंग आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
राजकीय निरीक्षकांच्या मते, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही भावनिक आणि धार्मिक साद घालून मतदारांना दिशाभूल करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मंदिराचा मुद्दा पुढे करून खऱ्या विकासाच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा वार ओपन प्रवर्गाला गेल्याने दोन्ही गटांतून ओबीसी उमेदवारांना संधी देण्याच्या चर्चांनीही जोर पकडला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ओबीसी मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.