औसा (प्रतिनिधी) :
औसा नगरपालिकेमार्फत शहरात विविध विकासकामे सुरू आहेत; मात्र या विकासकामांच्या नावाखाली बोगस व निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचा गंभीर आरोप भिम आर्मी भारत एकता मिशन तर्फे करण्यात आला आहे. या संदर्भात भिम आर्मीचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित अभियंते व गुत्तेदारांविरोधात कारवाईची मागणी केली होती. परंतु एक महिना उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने संघटनेने तीव्र भूमिका घेतली आहे.
या निष्क्रियतेविरोधात दि. ०३ नोव्हेंबर २०२५ पासून भिम आर्मी भारत एकता मिशनचे तालुका संघटक सुनील जोगदंड यांनी औसा नगरपालिका समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात कडघर गल्लीतील रस्ता पुन्हा करण्यात यावा, तसेच औसा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आजतागायत ते आश्वासन पूर्ण झालेले नाही, असा आरोप करण्यात आला.
या सर्व मागण्या तातडीने मान्य करून प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्यास उपोषणकर्त्याच्या जिवाला काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आमदार अभिमन्यू पवार, नगरपालिका अभियंते, गुत्तेदार तसेच बोगस कामात सामील असलेले अधिकारी यांच्यावर राहील, असा तिखट इशारा भिम आर्मी मराठवाडा निरीक्षक अक्षय धावरे यांनी दिला.
या वेळी उपस्थितांमध्ये भिम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे, कार्याध्यक्ष बबलू गवळे, जिल्हा संघटक सोनू घोडके, जिल्हा संघटक समाधान कांबळे, तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शहर अध्यक्ष मुज्जू शेख, भिम आर्मी खरोसा सरखाल प्रमुख प्रकाश अवचारे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शिवाजी कुंभार, शहर अध्यक्ष सद्दाम पठाण, शहर महासचिव इल्यास चौधरी, मोतीराम (मामा) कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
औसा शहरातील नागरिकांमध्ये या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली असून नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.