– ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. शरद जावडेकर
लातूर, दि. ११(मिलिंद कांबळे)
“शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण हे राष्ट्र वा व्यक्तीच्या समृद्धीसाठी नाही, तर समाजात द्वेष, फूट आणि विघटन पसरविण्यासाठी रचले गेले आहे,” असा थेट आरोप ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. शरद जावडेकर यांनी केला.
अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेच्या लातूर जिल्हा शाखेतर्फे, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय शिक्षण दिन) आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रम बाबासाहेब परांजपे फाउंडेशन येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवादलाचे जिल्हाध्यक्ष साथी पांडुरंग देडे होते.
विचारमंचावर प्रा. डॉ. अशोक नारनवरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बी. आर. पाटील आणि उर्मिलाताई पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. अशोक नारनवरे यांच्या हस्ते ‘शिक्षण हक्क पत्रिका’च्या १३ व्या विशेषांकाचे “शैक्षणिक तत्त्ववेत आणि त्यांची प्रासंगिकता” या विषयावर आधारित अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यानंतर “शोषितांचे शिक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०” या विषयावर विचार मांडताना प्रा. जावडेकर म्हणाले, “एनसीईआरटीसारखी शासनसंस्था देखील आता धार्मिक द्वेष वाढविणाऱ्या पुस्तकांचे संपादन करत आहे. ‘प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधा’ अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. शिक्षणातून फोडा-झोडा संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, “नवीन शैक्षणिक धोरणाच्या मागे ‘हिंदू राष्ट्र निर्माण’ हा एक छुपा अजेंडा आहे. शंबुक आणि एकलव्य हीच त्यांच्या गुरुकुल परंपरेची खरी ओळख आहे. आपण हा डाव वेळीच ओळखून संविधानिक मार्गाने थोपवला पाहिजे.” या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रा. दत्ता सोमवंशी, डॉ. दशरथ भिसे, डॉ. गणेश गोमारे, रावण राजे आत्राम, शाम वरयानी, शिवाजीराव शिंदे, श्री. प्रताप माने पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अनिल जायभाये यांनी केले, सूत्रसंचालन रामकुमार रायवाडीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार शाम जैन यांनी केले.
या वेळी इंजि. श्रीधर शेवाळे, डॉ. रब्बानी शेख, सुरेखा पिटलेवाड, गणपतराव तेलंगे, गोपाळतात्या चिकाटे, सारंग पिटलेवाड, भावेश पाटील, युनूस पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.