नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाला जाग येईल कधी ?
निलंगा,दि.14(मिलिंद कांबळे
निलंगा शहरातील अटलवाक हा नागरिकांचा सकाळचा श्वास आणि संध्याकाळचा विरंगुळा. पण याच ठिकाणचे सार्वजनिक शौचालय महिनोनमहिने कुलूपबंद आहे. परिणामी “स्वच्छता अभियान” आणि “स्मार्ट शहर” या घोषणांचा फक्त धुरळा उडत असून, प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा दैनंदिन गोंधळ वाढतच चालला आहे.
येथे फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी अटलवाकला येणाऱ्या नागरिकांना अचानक गरज भासताच कुठेच सुविधा नसल्याने असहाय परिस्थिती निर्माण होते. विशेषतः जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक बनली आहे.
एक महिला नागरिक म्हणाली
“ही आमची फिरण्याची जागा आहे की शिक्षा भोगण्याची? शौचालयाला इतकी महिने कुलूप ठेवण्याचे कारण तरी प्रशासन सांगणार का?”शौचालय बंद असल्याने नागरिकांना इतरत्र पर्याय शोधण्याची वेळ येत आहे.
यामुळे अटलवाककडे कुटुंबांसह जाण्याचे प्रमाण घटले आहे.
स्वच्छतेच्या नावाने लाखो रुपयांचे फलक लावणाऱ्या प्रशासनाची ही अवस्था पाहून नागरिक तिरस्कार व्यक्त करत आहेत.स्थानिक नागरिकांनी, नियमित फिरस्त्यांनी आणि युवकांनी प्रशासनाला अनेकदा त तक्रारी दिल्या.
परंतु शौचालय दुरुस्ती, पाणीपुरवठा पुनर्स्थापना किंवा स्वच्छता तपासणी यापैकी एकाही कामाचे आदेश अद्याप निघालेले नाहीत.
अटलवाक परिसरात फुलझाडे, लाईटिंग, सजावट, बाके यांवर खर्च करून देखावा वाढवला गेला. पण नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक शौचालय मात्र दुर्लक्षितच आहे.
एक तरुण कार्यकर्ता म्हणाला
“फोटोसाठी सजावट, पण नागरिकांसाठी सुविधा नाही! हा कोणता विकास?”
याविषयी परिस्थिती अधिक चिघळल्यास नागरिकांनी ठिय्या आंदोलन, घोंगडी जमवून निदर्शने यांसह पुढील लढ्याची तयारी दर्शवली आहे.