लातूर,दि.14
देवणी पोलिसांनी लासोना ते देवणी मार्गांवरील पुलाजवळ बुधवारी रात्री साडेदहा वाजता छापा टाकून 2 लाख 8 हजारांचा विमल पान मसाला, व्ही आय नावाची तंबाखू आणि 4 लाखांची कार असा एकूण 6 लाख 57 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल धुमे यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या पथकाने देवणी ते लासोना या मार्गांवरील पुलाजवळ टाटा इंडिगो कार क्रमांक एम एच 01 ए आर 4817 थांबवून तपासणी केली असता गाडीत विमल पान मसाला आणि व्ही आय तंबाखू असा एकूण 2 लाख 8 हजारांचा प्रतिबंधित गुटखा आणि 4 लाख किमतीची कार असा एकूण 6 लाख 57 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत रिझवान मन्नान मोमीन रा. शिवडी बाजीराव ता. लोहा, जि. नांदेड यास ताब्यात घेतले आहे. आरोपीविरोधात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडे हे करत आहेत.