निलंगा, दि.15
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजीबाबा आंबेडकर व समता, न्याय आणि मानवाधिकारांच्या लढ्यातील अग्रणी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त निलंग्यात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समाजप्रबोधन, आत्मसन्मान आणि क्रांतिकारक विचारांना समर्पित हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडला.
कार्यक्रमाला सुरुवात दोन्ही महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.यावेळ उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करत समाजातील ऐक्य, बंधुता आणि शिक्षण या मूल्यांचा पुनःसंस्कार करण्याची गरज असल्याचे व्यक्त केले.
सुभेदार रामजीबाबा आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना दिलेले कठोर शिस्तीचे संस्कार व समता-विचारांचे बीज आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे मत वक्त्यांनी केले. लहुजी वस्ताद साळवे यांनी शोषित-वंचितांना आत्मरक्षणाचे सामर्थ्य दिले, अत्याचाराला प्रतिकार करण्याची उर्मी दिली, याचीही उजळणी करण्यात आली.
स्थानिक समाजबांधवांच्या पुढाकाराने आयोजित हा कार्यक्रम शांततेत, एकात्मतेने व भावणीक वातावरणात संपन्न झाला.
यावेळी संतोष कांबळे, प्रदीप थोरात, नागेश कांबळे, सुनील काळे, भगवानअण्णा कांबळे, शुभम कांबळे, बजरंग कांबळे, रवी कांबळे, अविनाश दोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन्ही महामानवांचे क्रांतिकारी कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा जयंती कार्यक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे उपस्थित बांधवांनी सांगितले. समाजातील ऐक्य वाढवणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेणे हा सामूहिक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.