लातूर,दि.16
कर्तव्यनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असून, ही घटना सरळसरळ “आत्महत्या नसून हत्या” असल्याचा गंभीर आरोप विविध राष्ट्रीय संघटनांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व राजकीय, प्रशासकीय आणि पोलीस संबंधित दोषींवर तात्काळ कठोर गुन्हे नोंदवून फाशीपर्यंतची शिक्षा देण्याची मागणी श्रमिक हक्क अभियान एनसीडीएचआर भारत, राष्ट्रीय सामाजिक न्याय आंदोलन, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बौद्ध इंटरनॅशनल संघटना यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने सरकारकडे निवेदन देऊन केली.
डॉ. संपदा मुंडे या फलटण (जि. सातारा) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे सेवा देत होत्या. नियमांचे काटेकोर पालन आणि गैरप्रकारांना कडाडून विरोध हा त्यांचा स्वभाव होता. मात्र त्यांच्याकडून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा दबाव, राजकीय हस्तक्षेप, पोलीसांची ढवळाढवळ आणि वारंवार मानसिक छळ या सर्वांचा त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम झाला होता. यासंदर्भातील त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या लिखित तक्रारींना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप संघटनांनी निवेदनातून केला आहे.
याप्रकरणी माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर आणि त्यांच्या पी.ए. यांनी डॉ. मुंडे यांच्यावर सातत्याने फोनद्वारे दबाव टाकल्याचे उघड झाले असून, त्या दबावामुळेच त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे ही घटना “आत्महत्या नसून थेट हत्याच” असल्याचे मत संघटनांनी मांडले. पहिली तक्रार दाखल करूनही संबंधित पोलीस अधिकारी निष्क्रिय राहिल्याने रक्षकच भक्षक बनल्याचा आरोपही करण्यात आला.
याबाबत संघटनांनी सरकारसमोर पुढील प्रमाणे मुख्य मागण्या ठामपणे मांडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने
सर्व आरोपींना तात्काळ अटक करून हत्या, छळ आणि दबावाचे गुन्हे नोंदवावेत
तपास स्वतंत्र विशेष पथकाकडे देण्यात यावा प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून १ वर्षात निकाल दिला जावा. डॉ. मुंडे यांच्या कुटुंबीयांना संरक्षण, एका सदस्यास नोकरी, तसेच २५ ते ३० कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी
याप्रकरणी दोषींना फाशीपर्यंतची कठोर शिक्षा देण्याची तरतूद करावी अशीही मागणी निवेदनात
करणायत आले. दिलेल्या निवेदनावर ज्ञानेश्वरभाऊ सूर्यवंशी (राष्ट्रीय अध्यक्ष), अॅड. जे.बी. भाले, दशरथभाऊ कांबळे, डॉ. मधुकर कांबळे, मुजीब शेख, गुलामरसूल शेख, पांडुरंग सूर्यवंशी आणि देवानंद सावंत (संघटना प्रमुख व शाहीर) यांचा समावेश होता.