राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा तीव्र संताप –
आरोपीला फाशीच हवी ठाम मागणी…
मालेगाव तालुका | डोंगराळे
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या दुदैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
या अमानुष कृत्याचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध केला असून, अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीवर कोणतीही दया न दाखवता फास्टट्रॅक न्यायालयातून सुनावणी करून फाशीची शिक्षा तात्काळ देण्यात यावी, अशी संघाची ठाम भूमिका आहे.
संघाच्यावतीने सांगण्यात आले की, महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांना रोखण्यासाठी सरकारने कठोर ‘कडक कायदा’ तातडीने लागू करावा, जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल. “समाजात भीती निर्माण होण्यासाठी आणि भविष्यात अशा अमानुष घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा मिळणे अत्यावश्यक आहे,” असे संघाने स्पष्ट केले.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत, न्याय मिळवून देण्यासाठी संघ पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले आहे.