दौंड,दि.०७ (प्रकाश सोनवणे)
दिल्ली येथे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभा घेतलेल्या मैदानाचे काही व्यक्तींनी ‘शुद्धीकरण’ केल्याच्या प्रकारावरून संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा, दौंड शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
एखाद्या व्यक्तीने सभा घेतलेल्या सार्वजनिक ठिकाणाचे ‘शुद्धीकरण’ करण्याची कृती जर जातीय भेदभावाच्या भावनेतून करण्यात आली असेल, तर हा प्रकार गंभीर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. संविधानाच्या भारतात कोणत्याही व्यक्तीला जात, जन्म किंवा सामाजिक ओळखीच्या आधारावर ‘अशुद्ध’ ठरवण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय विषमता, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची हमी दिली. त्यामुळे संविधानिक मूल्यांना बाधा आणणाऱ्या कोणत्याही कथित प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी. शुद्धीकरणाचा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, त्यामागे जातीय भेदभावाचा हेतू होता का आणि कोणत्या कायदेशीर तरतुदी लागू होताt टी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय विषमतेविरुद्ध उभा केलेला संघर्ष हा केवळ इतिहासाचा भाग नसून आजच्या संविधानिक भारतासाठीही मार्गदर्शक आहे. त्यामुळे जातीय भेदभावाची मानसिकता कोणत्याही स्वरूपात आढळल्यास तिची कायदेशीर चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, हा संविधानाचा मूलमंत्र प्रत्यक्षात कायम राहिला पाहिजे, अशी भूमिका भारतीय बौद्ध महासभेने व्यक्त केली आहे.
यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना भारतीय बौद्ध महासभा, दौंड शहर शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनावर सरचिटणीस संजय सोनवणे, श्रीकांत साळवे, प्रभाकर कोरे, श्रीकांत शिंदे, शशी वांटे आणि व्ही. एस. कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.