लातूर,दि.१९
देवणी तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करताना प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी सागर मुळीक यांनी पादत्राणे न काढल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे आंबेडकरी समाजासह पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित अधिकाऱ्याची तातडीने चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
१५ ऑगस्ट रोजी देवणी तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा शासकीय कार्यक्रम झाला. ध्वजारोहणानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना संबंधित अधिकाऱ्यांनी पादत्राणे न काढल्याचे दृश्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे महापुरुषांच्या प्रतिमेसमोर शासकीय शिष्टाचाराचे पालन झाले का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या प्रतिमेसमोर घडलेल्या कथित प्रकारामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याची भूमिका व्यक्त होत आहे.
दरम्यान, उपलब्ध छायाचित्रे, व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि संबंधित अधिकाऱ्यांची बाजू तपासून या घटनेची निष्पक्ष चौकशी करावी. चौकशीत शासकीय शिष्टाचाराचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापुरुषांचा सन्मान हा केवळ औपचारिकता नसून संविधानिक मूल्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी आंबेडकरी व पुरोगामी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
या प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे लातूर (दक्षिण) जिल्हाध्यक्ष प्रा. नरसिंग सूर्यवंशी आनंदवाडीकर यांनी नाराजी व्यक्त केली असून, निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.