निलंगा, दि. १८
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हरी जवळगा येथील कमळाई सार्वजनिक वाचनालय आणि कॅप्टन शाहूराज बिराजदार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महादेव मंगल कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात परिसरातील २१ माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला. वादविवाद स्पर्धेतील विजेते, स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी आणि निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सौ. मंजुषा कोकणे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व सत्कारमूर्तींना सन्मानचिन्हाऐवजी ‘ज्ञानेश्वरी’ची प्रत भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रेल्वे कर्मचारी रियाज तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, वाचन आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ यांचे वंशज श्रीधर मधुकर खेडगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेल्वे सेवेत दाखल झालेले अनिल घाडगे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीसाठी मार्गदर्शन करून मराठी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला.
प्रा. दिलीपकुमार हल्ळे यांनी प्रास्ताविक केले. बालाजी जाधव व विरेश नीला यांनी सूत्रसंचालन केले, तर अजय मोरे यांनी आभार मानले.