निलंगा,दि.०१(मिलिंद कांबळे)
थोर समाजसुधारक, साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निलंगा शहरात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचे स्मरण करून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करत समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या सन्मानासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले.
यावेळी नगराध्यक्ष संजयराज हलगरकर म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून समता, सामाजिक न्याय आणि मानवी स्वाभिमानाचा विचार समाजात रुजविला. त्यांच्या कार्यातून आजही समाजाला प्रेरणा मिळते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमास नगरपालिकेचे सभापती, नगरसेवक, पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोपप्रसंगी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतेचा संदेश अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा तसेच समाजप्रबोधनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.