निलंगा,दि.२५
“केल्याने देशाटन, मनुष्य ज्ञानसमृद्ध होतो” या उक्तीची प्रचिती देणारी महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथील शैक्षणिक सहल दिनांक 20 ते 23 मार्च 2026 दरम्यान उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या सहलीत विद्यार्थ्यांनी इतिहास, संस्कृती, धर्म आणि विज्ञान यांचा संगम प्रत्यक्ष अनुभवत ज्ञानाची नवी क्षितिजे गाठली.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुती मंदिर, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जायकवाडी धरण, संत एकनाथ महाराज समाधी आणि पैठण उद्यान या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्यांच्या वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास केला.
प्रत्येक स्थळी विद्यार्थ्यांनी स्थापत्यकला, ऐतिहासिक वारसा, धार्मिक परंपरा आणि सामाजिक योगदान यांचे बारकाईने निरीक्षण केले. पाठ्यपुस्तकातील माहिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडली असून अभ्यासाविषयीची उत्सुकता अधिक वाढली.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सहकार्य, वेळेचे नियोजन आणि समूहभावना यांचा विकास झाला. शिक्षणासोबतच जीवनमूल्यांचेही बाळकडू मिळाल्याने ही सहल सर्वार्थाने यशस्वी ठरली.
सहल यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक श्री. पवार डी. डी., सहल विभाग प्रमुख श्री. सोनवणे बी. एम., तसेच श्री. सलघंटे व्ही. आर., श्री. कांबळे एस. ए., श्री. मुगळे एस. आर., श्रीमती जन्मले एस. ए., श्रीमती माळी व्ही. बी., श्री. जाधव एस. वाय. आणि श्री. सुरवसे डी. यांनी परिश्रमपूर्वक नियोजन केले.
या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. विजय पाटील निलंगेकर, सचिव श्री. सरतापे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. नटवे एम. आर., उपमुख्याध्यापक श्री. पवार डी. डी., पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख एस. डी. व पर्यवेक्षक श्री. बिराजदार आर. ए. यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
एकूणच, ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि आयुष्यभर स्मरणात राहणारा अनुभव ठरली.