निलंगा, दि. ०३
मौजे सावनगिरा (ता. निलंगा, जि. लातूर) येथील अंगणवाडीत घडलेला प्रकार हा थेट बालकांच्या जीवाशी खेळ करणारा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस ठरला आहे. निरागस बालकांच्या ताटात पोषणाऐवजी अळ्यांनी भरलेला खाऊ देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
अंगणवाडीत वितरित करण्यात आलेल्या खाऊमध्ये अळ्या आढळल्यानंतर काही बालकांनी तो खाऊ खाल्ला आणि त्यानंतर उलट्या, पोटदुखी यांसारखे त्रास सुरू झाले. आपल्या लेकरांची अशी अवस्था पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. तातडीने मुलांना दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आले. सध्या बालकांची प्रकृती स्थिर असली तरी या घटनेने पालकांमध्ये भीती आणि संताप यांचा उद्रेक झाला आहे.
बालकांच्या पोषणासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्याच योजनांतून जर सडलेला, दूषित आणि अळ्यांनी भरलेला खाऊ बालकांना दिला जात असेल, तर ही केवळ निष्काळजीपणा नसून सरळ सरळ गुन्हा आहे. “ही चूक नाही, हा गुन्हाच आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित अधिकारी आणि प्रशासनाने या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का ? यामुळेच आज ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे का ? यामागे हलगर्जीपणासोबतच भ्रष्ट कारभाराचा संशयही व्यक्त केला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, इतकी गंभीर घटना घडूनही प्रशासनाकडून तत्काळ ठोस कारवाई झालेली नाही. दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना वाचवणारे अधिकारी देखील तितकेच दोषी आहेत,” असा संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि खाऊ पुरवठादारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच संपूर्ण अन्नपुरवठा साखळीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ही घटना केवळ एका अंगणवाडीपुरती मर्यादित नसून संपूर्ण यंत्रणेला दिलेला गंभीर इशारा आहे. आता तरी प्रशासनाने झोपेतून जागे होऊन ठोस कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरेल, यात शंका नाही.
आमच्या ♟️ संविधान लाईव्ह 24 न्यूज 🎥 चॅनेलला Subscribe 🔔करा, Like करा,Comments ✒️ करा
व Share 📲करा.व्हाट्सएप नंबर -📱 9960049411 संपर्क – 📞9325270286