लातूर, दि. ७
बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तपासात बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश प्रभाकर पाठक (वय ५५) यांना गुरुवारी लातूर येथून अटक केली. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, बीड येथे गुन्हा क्रमांक ५४४/२०२६ अंतर्गत दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान अविनाश पाठक यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर बीड पोलिसांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली. पाठक हे बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते लातूर शहरातील हत्ते नगर परिसरात वास्तव्यास आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथून विशेष पोलीस तपास पथक आज सकाळी लातूर येथे दाखल झाले. लातूर जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने या पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत अविनाश पाठक यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून त्यांना औपचारिक अटक करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटरामन (भा.पो.से.), उपविभाग केज तथा अतिरिक्त पदभार उपविभाग बीड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास पथकाने अत्यंत गोपनीयतेने आणि कायदेशीर चौकटीत राहून ही कारवाई केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(५), ३३८, ३३६(३), ३४०(२), १९८, १९९, ३१६(२), ३५१(४) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १३ अंतर्गत दाखल आहे. याशिवाय मध्यस्थी व सलोखा कायद्यातील कलम १४ व ३४ अंतर्गतही प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास अधिक वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या अविनाश पाठक यांना पुढील चौकशीसाठी बीड येथे नेण्यात येणार असून त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत मोठी चर्चा सुरू झाली असून तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.