जळगाव जामोद,दि.१५
जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या तरुणीच्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, पित्यानेच मुलाच्या मदतीने मुलीची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी राजुरा शिवारात २० ते २५ वयोगटातील एका तरुणीचा अर्धवट जळालेला तसेच शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सुरुवातीला मृत तरुणीची ओळख पटवणे आणि आरोपींपर्यंत पोहोचणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
फॉरेन्सिक पथक, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. तपासादरम्यान तरुणीचे तिच्या चुलत भावासोबत संबंध असल्याच्या संशयातून पित्यानेच मुलाच्या मदतीने तिची हत्या केल्याचे समोर आले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.