सोलापूर,दि.२७
सोशल मीडियावरील रील्समुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या “हॉटेल ग्रामपंचायत”च्या मालकीण रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी गळफास घेऊन स्वहत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी साडेदोनच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील “हॉटेल ग्रामपंचायत”च्या स्वयंपाकघरात पत्र्याच्या लोखंडी रॉडला दोरी बांधून रोहिणी पाराध्ये यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबत पती निलेश पाराध्ये यांनी पोलिसांत खबर दिली असून स्वहत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
रोहिणी आणि निलेश पाराध्ये हे विविध सामाजिक विषय, ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यपदार्थांवरील व्हिडीओ रील्समुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी येथे “हॉटेल ग्रामपंचायत” हा व्यवसाय सुरू केला होता.
व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आणि नव्या शाखेची तयारी सुरू असताना रोहिणी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. परिसरात शोककळा पसरली असून “हसतमुख चेहऱ्यामागे किती वेदना दडलेल्या असतात, हे कुणालाच कळत नाही,” अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.