निलंगा,दि.०७
निलंगा तालुक्यातील येलमवाडी येथे मोठ्या प्रमाणात वाळूसाठा करण्यात आल्याचे छायाचित्रे समोर आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. संबंधित साठ्याबाबत आवश्यक परवानग्या, रॉयल्टी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याबाबत महसूल विभागाने तातडीने पडताळणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचे ढीग साठवून ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या साठ्याची कायदेशीर स्थिती, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित परवानग्यांची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.
गौण खनिजांच्या उत्खनन व साठवणुकीबाबत शासनाने विविध नियम व अटी निश्चित केलेल्या आहेत. त्यामुळे येलमवाडी येथील सदर साठ्याची महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. नियमांचे पालन झाले असल्यास त्याबाबत स्पष्टता यावी आणि काही अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी महसूल विभागाकडून अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाच्या तपासणीनंतरच सदर साठ्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याने नागरिकांचे लक्ष आता महसूल विभागाच्या भूमिकेकडे लागले आहे.