निलंगा,दि. ०९
जि. प. प्रशाला अंबुलगा बु. येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद सुरेश कल्पेकर तर उपाध्यक्षपदी सीमा दत्ता सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना देतानाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता नवनिर्वाचित समितीवर आली आहे.
प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात शासन निर्णयानुसार सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या पालकांमधून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर निवड झालेल्या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये विनोद कल्पेकर यांची अध्यक्षपदी तर सीमा सूर्यवंशी यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या सोडविणे, शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणे तसेच शाळेच्या विकासकामांमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.यावेळी जि. प. सदस्य चंद्रकांत होरे, पं. स. सदस्य वामनराव कांबळे, सरपंच स्वाती शिंदे, उपसरपंच जगदिश सगर, विद्यमान अध्यक्ष सदानंद बिरादार, उपाध्यक्ष यशोधन कांबळे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच समितीच्या सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास मुख्याध्यापक गणेश तुबाकले, शांतेश्वर खटके, आशिष पाटील, बालाजी बडगे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच मोठ्या संख्येने पुरुष व महिला पालक उपस्थित होते. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.